नागपूर : पाणीपुरी म्हणजे बहुतेकांचा जीव की प्राण! लग्न समारंभांपासून ते उद्याने आणि बाजारपेठांपर्यंत सर्वत्र पाणीपुरीच्या गाड्या दिसतात. चव आणि किमतीचं गणित जमलेलं तर त्या पाणीपुरीवाल्याकडे गिऱ्हाईकांच्या अक्षरशः उड्या पडतात.
पाणीपुरी एकदम फ्री : पाणीपुरी ज्याला काही भागात गोलगप्पा किंवा पुचका असेही म्हणतात, हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूडपैकी एक आहे. छोट्या मसालेदार पाणीपुऱ्या केवळ भारतातच नाही तर आता जगभरात लोकप्रिय झाले आहेत. पण ही चविष्ट पाणीपुरी एकदम फ्री.. तेही आयुष्यभर असं कोणी सांगितलं तर..? तर, अशीच एक ऑफर नागपुरातल्या एका पाणीपुरीवाल्याने देऊ केली आहे. त्यामुळे हा पाणीपुरीवाला सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
हेही वाचा - Viral Funny Video : गायीसमोर केला डान्स; 'हं.... मला नाही आवडलं..' बघा गायीनं कसं सांगितलं..
नागपूरच्या पाणीपुरीवाल्याकडून अनोखी ऑफर
नागपूरमधील एका पाणीपुरी विक्रेत्याने ग्राहकांना अशी ऑफर दिली आहे, ज्यामुळे त्यांना आयुष्यभर मोफत पाणीपुरी खायला मिळू शकते. या ऑफर अंतर्गत, जर ग्राहकांनी एकाच वेळी 99,000 रुपये दिले तर, त्यांना या पाणीपुरीवाल्याकडे आयुष्यात कधीही कितीही वेळा पाणीपुरी खाता येईल आणि यासाठी पैसेही द्यावे लागणार नाहीत. अर्थात, ही ऑफर किती जण घेतील माहीत नाही, पण या ऑफरमुळे पाणीपुरीवाल्याची चांगली पब्लिसिटी झाली आहे.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
ही अनोखी आणि मनोरंजक ऑफर सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. ही पोस्ट इंस्टाग्राम अकाउंट marketing.growmatics वरून शेअर करण्यात आली आहे, जी आतापर्यंत 16,000 हून अधिक लोकांनी लाईक केली आहे. या ऑफरवर लोक आपले मत व्यक्त करत आहेत. एका वापरकर्त्याने विचारले, "ही ऑफर माझ्या आयुष्यासाठी आहे की दुकानदाराच्या आयुष्यासाठी?"
हेही वाचा - Viral Video : टक्कल केल्यावरही किती सुंदर दिसतेय नवरी! धाडसी निर्णय घेत विग घालण्याचं टाळलं; तब्बल 4 कोटी व्ह्यूज
तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले की, "त्याला माहीत आहे की, त्याला कोणीही पैसे देणार नाही, पण त्याचे काम झाले आहे." याशिवाय, बरेच लोक या ऑफरच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यांनी असं म्हटलंय की, पाणीपुरीवाला पैसे घेऊन पळूनही जाऊ शकतो.