३१ जुलै, २०२४, नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या फेर पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ८ उमेदवारांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी झाली होती. फेर पडताळणीमध्ये नाशिक मधून प्रमाणपत्र मिळवलेल्या बाळू मरकड याचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आलं होतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिलेल्या दिव्यांग प्रमाणपत्रातील अपंगत्वात मोठी तफावत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बाळू मरकड याने यापूर्वी जोडलेल्या दिव्यांग प्रमाणातपत्रात ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचं दाखवलं होतं. मात्र, फेर पडताळणीमध्ये आणि तपासणीत बाळू मरकड केवळ १५ ते २० टक्के दिव्यांग असल्याचं समोर आले आहे. नाशिकमध्ये करण्यात आलेल्या फेर पडताळणीचा गोपनीय अहवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.