मुंबई: राज्यात थंडीच्या तीव्रतेने गेल्या काही दिवसांत चांगलाच जोर धरला होता. मात्र, आता हवामान विभागाने पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरेकडील राज्यांतील कोरडे आणि थंड वारे राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पोहोचल्याने थंडीची लाट अनुभवायला मिळाली. आता मात्र पूर्वेकडील वाऱ्यांचे वर्चस्व वाढणार असून तापमानात बदल होण्याची शक्यता आहे.
तापमानात वाढ होणार
पुणे जिल्ह्याचे किमान तापमान रविवारी 12 अंश सेल्सिअस होते, ते मंगळवारपर्यंत 15 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जळगावमध्ये काल निचांकी 8.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भातील तापमानही मोठ्या प्रमाणात खाली आले होते. मात्र, पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमानात 2-3 अंशांनी वाढ होणार आहे.हवामान विभागाने सांगितल्यानुसार, सध्या लक्षद्वीप आणि मालदीव परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 24 तासांत चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीत बदल होईल आणि कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाड्यात तापमानात 1-2 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होईल. मात्र, विदर्भातील तापमान फारसे बदलण्याची शक्यता नसल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे.राज्यभरातील हवामानातील हे बदल लक्षात घेता थंडीचा जोर ओसरत असल्याचे स्पष्ट होत आहे.