गणोजी शिर्केंच्या भूमिकेवर वाद, लक्ष्मण उतेकरांनी दिले स्पष्टीकरण
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' चित्रपट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातील गणोजी शिर्के यांच्या भूमिकेवर शिर्के घराण्याच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटात आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात असल्याचा आरोप भूषण शिर्के आणि दीपक शिर्के यांनी केला असून, वादग्रस्त सीन हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला.
👉👉 हे देखील वाचा : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने 8व्या दिवशी ओलांडला 242 कोटींचा गल्ला; पंतप्रधान मोदींनीही केलं कौतुक!
या वादानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी एक ऑडिओ संदेश जारी करत शिर्के घराण्याची माफी मागितली. त्यांनी स्पष्ट केले की, "चित्रपटात कुठेही शिर्के आडनावाचा उल्लेख नाही, तसेच त्यांचे गावही दाखवलेले नाही. माझ्याकडून नकळत जर भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागतो."
लक्ष्मण उतेकरांचे स्पष्टीकरण:
"आदरणीय भूषणजी, मी तुमचा फोन नेटवर्कमुळे उचलू शकलो नाही. तुमच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे ऐकले आणि जर माझ्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो. हा चित्रपट पूर्णपणे शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ कादंबरीवर आधारित आहे. कादंबरीतील माहिती चित्रपटात जशीच्या तशी सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रकारे मी ऐतिहासिक वास्तवात बदल केला नाही."
शिर्के आडनावाचा उल्लेख नाही - उतेकरांचा दावा
लक्ष्मण उतेकर पुढे म्हणाले, "मी चुकीचा नसेन तर टीव्ही मालिकेत शिर्के आडनावासह त्यांचे गाव दाखवण्यात आले होते, मात्र आमच्या चित्रपटात आम्ही ती खबरदारी घेतली आहे. चित्रपटात गणोजी आणि काणोजी यांचा उल्लेख एकेरी नावाने केला आहे. कुठेही त्यांचे आडनाव किंवा गावाचा उल्लेख नाही."
"पैसे कमावण्यासाठी इतका मोठा धोका का घेईल?"
या वादासंदर्भात लक्ष्मण उतेकर म्हणाले, "हा चित्रपट इतिहासाचा विकृत सादरीकरण करण्यासाठी किंवा पैसे कमावण्यासाठी बनवलेला नाही. माझ्याकडे पैसे कमावण्यासाठी इतर अनेक विषय होते. हा चित्रपट चार वर्षांच्या मेहनतीनंतर तयार झाला आहे. संभाजी महाराजांवर किती चुकीचे लिखाण आहे हे सर्वज्ञात आहे. ते पुसून, जगाला संभाजी महाराजांचे खरे स्वरूप दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे."
शिर्के वंशजांचा आक्षेप:
गणोजी शिर्के आणि त्यांच्या भावाने संभाजी महाराजांच्या घातात महत्त्वाची भूमिका बजावली, असे चित्रपटात दाखवले आहे. मात्र खरोखरच त्यांचा यात सहभाग होता का? याचे ऐतिहासिक पुरावे काय आहेत? असा सवाल शिर्के घराण्याच्या वंशजांनी उपस्थित केला आहे. इतिहासाची तोडमोड करीत ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
लक्ष्मण उतेकर यांच्या या खुलाशानंतर शिर्के घराण्याची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.