राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. मार्च महिन्यात 2100 रुपये मिळतील, अशी कोणतीही घोषणा सरकारने केलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी विधानसभेत बोलताना सांगितले की, 'यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेद्वारे 2100 रुपये देण्याची कोणतीही घोषणा आम्ही केलेली नाही.'
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
विधानसभेच्या अधिवेशनात बोलताना आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, 'आम्ही कधीही असे जाहीर केले नव्हते की मार्च महिन्यात किंवा या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात 2100 रुपये दिले जातील. सरकार एखादी योजना जाहीर करते, तेव्हा ती पाच वर्षांसाठी असते. त्यामुळे या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या रकमेबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.' यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, 'या योजनेसाठी शासनासमोर एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे, मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.'
महिला दिनानिमित्त एक दिलासा
याच दरम्यान, राज्यातील महिलांसाठी एक सकारात्मक बातमीही समोर आली आहे. आदिती तटकरे यांनी जाहीर केले की, “फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये एकत्रितपणे खात्यात जमा केले जाणार आहेत.” त्यामुळे तात्पुरता का होईना, लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळणार आहे.