१४ जुलै, २०२४ रत्नागिरी : मागील दोन दिवस चालू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सर्वच जनजीवनावर होताना दिसत आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेडमधील जगबुडी नदीने रौद्ररूप धारण केले असून रविवारी सकाळपासून नदी पाणी पात्राच्या वर वाहत आहे. खेडमध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. नदीचे सर्व पाणी बाजारपेठेत व्यापारी संकुलांमध्ये आणि मानवी वस्तीत घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खेड मटण मार्केट परिसरात जगबुडी नदीचे पाणी शिरलेबी आहे. पावसाचा जोर वाढल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नगर परिषदकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसाचा फटका जनजीवनावर होत आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे प्रशासनाने नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच, नदीकाठच्या आणि सखल भागातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. खेड चिपळूण आणि तळ्याचे वाकण या ठिकाणातील १२५ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. रविवारी रात्रीपर्यंत चिपळूण नाका परिसरातील ४१ तर तळ्याचे वाकन परिसरातील ८४ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.