मुंबईत मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या एका एअरटेल महिला कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. "मी मराठी बोलणार नाही, तुला जे करायचं ते करून दाखव!" असे धमकीवजा वक्तव्य करणाऱ्या या महिलेला मराठी जनतेचा जोरदार विरोध सुरू झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
चारकोप, मुंबई येथील एअरटेल सर्व्हिस सेंटरमध्ये एक मराठी तरुण आपल्या नेटवर्क समस्येबाबत तक्रार करण्यासाठी गेला होता. हिंदी भाषा व्यवस्थित बोलता न आल्याने त्याने मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर असलेल्या महिला कर्मचाऱ्याला मराठी समजत नसल्याने तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यावर तरुणाने तिला मराठीत संवाद साधण्यास सांगितले.
पण त्याऐवजी महिलेचा पारा आणखी चढला आणि तिने थेट धमकी दिली – "मी मराठी बोलणार नाही, तुला जे करायचं ते करून दाखव!" एवढ्यावरच न थांबता तिने आजूबाजूच्या लोकांना गोळा करून या तरुणालाच धमकावण्यास सुरुवात केली.
मराठी जनतेचा संताप आणि राजकीय प्रतिक्रिया
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ संबंधित तरुणाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. पाहता पाहता हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मराठी जनतेत संतापाची लाट उसळली.या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही पक्षांनी एअरटेलकडे या महिलेच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय, शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी थेट एअरटेल गॅलरीमध्ये जाऊन निषेध व्यक्त केला.