श्रीवर्धन : श्रीवर्धन येथे एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आला असून, रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने पती-पत्नीला अटक केली आहे. मृत व्यक्तीचे नाव रामदास खैरे असे आहे.आरोपी महिलेने रामदास खैरे यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. यानंतर तिने त्यांच्या कडील दागिने आणि रोख रक्कम घेतली आणि पतीच्या मदतीने पलायन केले. खैरे यांनी आपल्या हरवलेल्या मालमत्तेसाठी तगादा लावल्याने आरोपींनी भयंकर कट रचला.
आरोपी महिलेने खैरे यांना जेवणात कीटकनाशक मिसळून दिले. यामुळे खैरे बेशुद्ध झाले, त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्यात आले. हत्या केल्यानंतर आरोपींनी खैरे यांच्या घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी पती-पत्नीला जेरबंद केले. या कारवाईमुळे खैरे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
ही घटना समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीची भीषण बाजू उघड करत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सतर्कता बाळगण्याची गरज आहे. रायगड पोलिसांच्या शिताफीमुळे हा गुन्हा उघडकीस येऊन आरोपींच्या अटकेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.