Sunday, September 08, 2024 08:36:20 AM

Pune
पुण्याला पावसाने झोडपले

पुण्याला पावसाने झोडपले. बुधवार रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे पुण्याची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. नागरिकांची पंचाईत झाली.

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : पुण्याला पावसाने झोडपले. बुधवार रात्रीपासूनच पडत असलेल्या पावसामुळे पुण्याची दाणादाण उडाली आहे. पावसामुळे पुण्यातील अनेक सोसायट्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. नागरिकांची पंचाईत झाली. पोलीस तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान मदतकार्यात गुंतले आहेत. नागरिकांना सखल भागांतून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. भिडे पुलाजवळ डेक्कन जिमखाना परिसरात विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला. मागील २४ तासांत ४५ ठिकाणी झाडे पडली. ताम्हिणी परिसरात चोवीस तासांत ५५६ मिलीमीटर पाऊस झाला. शिरगाव परिसरातही ४८४ मिमी, आंबवणे येथे ४४० मिमी, माले ३०२ मिमी, मुळशी ३०५ मिमी, दावडी ३६७ मिमी पावसाची नोंद झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. 

पुणे शहरात चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला आहे. वारजे परिसरातील निवडक सोसायट्यांमध्ये तसेच सिहंगड रस्त्यावरील काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. रजपूत वीटभट्टीजवळ, गंजपेठ, चांदतारा चौक, शिवाजीनगर भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. भवानी पेठेतील गुळ आळी, वटेश्वर भुवन येथे मोठे झाड पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद. झाडाखाली काही वाहने अडकली आहेत. वडगाव बुद्रूक, महापालिका मैदान येथे भिंत कोसळली. हिंगणे खुर्द, साई नगर येथे डोंगरमाथ्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने घरात पाणी शिरले. वडगाव शेरीतील आनंदनगर बस थांब्याजवळ एका वाहनावर झाड कोसळले. भवानी पेठेत वाड्याची भिंत पडली. कोरेगाव पार्क, बर्निंग घाटाजवळ भिंत पडली. बावधन परिसरात पाणी जमा झाल्याने वाहने अडकली. पुलाची वाडी परिसरात वस्तीत पाणी शिरले. 

 पावसामुळे मोसे खोऱ्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरड कोसळणे, बंगल्यांची पडझड, रस्ते वाहतूक मंदावणे, वीज पुरवठा खंडीत होणे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. लवासा सिटीचा पायथा ते पुण्याहून लवासा मध्ये प्रवेश करतानाची कमान या दरम्यानच्या घाट रस्त्यात तीन ठिकाणी दरड कोसळली. मुख्य रस्त्यावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर माती व राडारोडा जमा झाला. लवासा ते वरसगाव या रस्त्यावरही काही ठिकाणी भेगा पडल्या असून रस्ता खचला आहे. या रस्त्यावर पडळघर येथील स्मशानभूमीलगतच्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. तेथील रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. आडमाळ परिसरात विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला आहे. 

पुण्यात मुसळधार पाऊस
सखल भागात पाणी साचले
सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले
पुण्यातील शाळा, कार्यालयांना सुटी

 

           

सम्बन्धित सामग्री