Friday, April 11, 2025 09:14:29 AM

साई मंदिरात हार, फुल आणि प्रसाद पुन्हा सुरू

साई मंदिरात आजपासून हार, फुल प्रसाद वाहण्याची सुरुवात झाली कोरोनाकाळापासून साई मंदिरात हार, फुल ,प्रसादावर बंदी घालण्यात आली होती.

 साई मंदिरात हार फुल आणि प्रसाद पुन्हा सुरू


शिर्डी : शिर्डीतील साईबाबा मंदिरात आजपासून हार, फुल आणि प्रसाद वाहण्याची परंपरा पुन्हा सुरू झाली आहे. कोरोना काळात सुरक्षा कारणास्तव साई मंदिर प्रशासनाने हार, फुलांवर आणि प्रसादावर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी हटवण्यात आली असून साईभक्त पुन्हा आपली श्रद्धा व्यक्त करू शकणार आहेत.

उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, साई संस्थानने विशेष नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार भक्तांना फुलं आणि हार मंदिरात घेऊन येण्याची परवानगी आहे. मात्र, ही विक्री “ना नफा, ना तोटा” या तत्त्वावर साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीकडून करण्यात येणार आहे.

भक्तांना दर्जेदार फुलं, हार आणि प्रसाद उपलब्ध व्हावेत यासाठी संस्थानने सर्वतोपरी व्यवस्था केली आहे. यामुळे एकीकडे भक्तांच्या श्रद्धेला पूरक असा हा निर्णय आहे, तर दुसरीकडे गडबड आणि गैरव्यवहार टाळण्याचा संस्थेचा प्रयत्नही दिसून येतो.साईभक्तांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी साईबाबांच्या चरणी पुन्हा आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहाने हार, फुलं आणि प्रसाद वाहायला सुरुवात केली आहे. 


सम्बन्धित सामग्री