पालघर : डहाणू बंदरात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार गेल्या वर्षभरापासून समुद्रातून रिकाम्या हाताने परत येत असल्याने येथे मत्स्य दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पावसाळ्याच्या दिवसांत डहाणू खाडी, वरोर, आगर, बोर्डी, झाई येथून कोळी बांधवांच्या घरोघरी मिळणारे सुके मासे विक्री बंद झाली असून, येथील काही मच्छीमार सुके बोंबील, करंदी, मांदेली, बांगडा, जवला, सुकट, सुके सोले, सुके खारे, इत्यादी गुजरातच्या संजान येथील खतलवाड येथून खरेदी करून डहाणू, चिंचणी, वरोर, वाणगाव, कासा, इत्यादी बाजारपेठेत विक्री करीत असताना दिसत आहेत.