१४ जुलै, २०२४ पंढरपूर : रविवारी, १४ जुलै रोजी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण ठाकूर बुवांची समाधी येथे पार पडलं. यावेळी उल्हासपूर्ण वातावरणात वारकर्यांनी गर्दी केली होती. भर पावसात ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडले. भगव्या पताका, टाळ - मृदूंगाचा गजर या वातावरणात अश्व धाव पार पडली. त्यानंतर वारकऱ्यांनी रिंगणातली माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडाली. जेव्हा पालखी मैदानात आली तेव्हा अवघा आसमंत ज्ञानेश्वर माउलींच्या जयघोषानं दुमदुमून गेला. या रिंगण सोहळ्यासाठी मैदान सुशोभीत करण्यात आलं होतं. ज्ञानेश्वर माउलींचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखीने तोंडले बोण्डले मार्गावरून मार्गक्रमण केले. यानंतर, टप्पा येथे ज्ञानेश्वर माउली आणि सोपानकाका यांच्या बंधूभेटीचा सोहळा पार पडणार आहेत. रविवारी भंडीशेगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.