मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा देखील मागण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही मागील सरकारमध्ये कृषीमंत्री असताना मुंडे यांनी कृषी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. तर करूणा शर्मा यांनीही धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मुंडे यांच्याविरोधातील आरोप काय?
बीड मधील खंडणी प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आहे.
खंडणीसाठी झालेली बैठक मुंडेंच्या बंगल्यावर झाल्याचा दावा
खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड मुंडेंचा समर्थक
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप
कृषीमंत्री असताना पीकविमा आणि शेती उत्पादनांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप
निविदा न काढता योजना सुरू केल्याचा मुंडेंवर आरोप
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी
धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनीही छळाची तक्रार केलीय
हेही वाचा : ममता महामंडलेश्वर पदावरच राहणार; राजीनामा स्वीकारण्यास त्रिपाठींचा नकार
धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रारी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मुंडे वादात सापडल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना पालकमंत्री पदाच्यायादीतून दूर ठेवले होते. भाजपाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबतचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यायचा आहे, असं सांगितलंय. मात्र राष्ट्रवादीकडून मुंडे यांच्यावर कोणती कारवाई होण्याऐवजी पक्षाच्या कोअर समितीत त्यांचा समावेश करून एकप्रकारे त्यांचा सन्मान केला आहे.
कोअर समितीत कोण?
कोअर समितीचे अध्यक्ष अजित पवार असणार आहेत. या समितीत माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश आहे.
धनंजय मुंडे यांच्यावरील कथित आरोपांमुळे पक्षाची बदनामी होत असल्याचा सूर राष्ट्रवादी पक्षात आळवण्यात आला होता. मात्र त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी त्यांचा सन्मान होत असल्याने महायुती सरकारसाठी ही अचडण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.