मुंबई: दक्षिण भारतात सक्रिय असलेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम तळकोकणातील वातावरणावरही दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. हिवाळ्याच्या ऐन मध्यात होत असलेल्या या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी या बदलत्या हवामानामुळे त्रस्त आहेत. आंबा व काजूच्या झाडांना फुलोऱ्याचा हंगाम सुरू असताना अशा हलक्या पावसामुळे फुलोऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. काजूच्या झाडांवर ओलसर हवामानाचा परिणाम होऊन कीड लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
या अनपेक्षित बदलामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीची भीती वाटत आहे. हिवाळ्यातील ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरींमुळे वातावरणातील गारवा कमी झाला आहे. याचा थेट परिणाम झाडांच्या आरोग्यावर होत आहे.‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामान खात्याने आगामी काही दिवसांत तळकोकणात आणखी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पिकांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.हवामान बदलाच्या अनियमिततेमुळे शेतकरी त्रस्त असून, सरकार व कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला व मदतीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे. ‘फेंगल’ चक्रीवादळाचा तडका आणि बदलते हवामान शेतकरी व त्यांच्या पिकांसाठी गंभीर चिंता निर्माण करत आहे.