"भाजपालाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं" - भुजबळ
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एका मुलाखतीत भाजपबद्दल सकारात्मक भूमिका मांडली आहे. भुजबळ म्हणाले, "फुले, शाहू, आंबेडकरांना भाजप मानायला लागले आहेत. भाजपसोबत काम करण्याची मला काही अडचण वाटत नाही. ओबीसींना ते सपोर्ट करत असतील तर मला काहीच अडचण नाही."
भुजबळांनी त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले, "सत्ता कधी येईल, कधी जाईल सांगता येत नाही. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले आहेत. सत्तेत असावं किंवा नसावं, पण समाजासाठी काम करणं महत्त्वाचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करण्याची शिकवण दिली. त्या प्रमाणे मी वागत आलोय."
शरद पवार यांच्याबद्दल बोलताना भुजबळ म्हणाले, "पवार साहेबांनी नोकरीत, शिक्षणात आरक्षण दिलं. राजकारणात कधी कधी मागे जावं लागतं. आपण घेतलेली भूमिका कधी कुणाला आवडत नाही, कुणाला आवडते. आजही दलित, मुस्लिम समाजाला न्याय मिळाला पाहिजे."
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अजित पवार यांच्या नेतृत्वाबद्दल विचारले असता, भुजबळ म्हणाले, "अजित पवार चांगले आहेत. पण शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार यांच्यात फरक आहे. माझा वापर कुणीच करू शकत नाही. राजीनामा देऊनच मी मराठा विरुद्ध ओबीसीच्या लढाईत उतरलो होतो."
भाजपसोबत जाण्याबद्दल विचारले असता, भुजबळ म्हणाले, "भाजपालाही वाटतं की मी त्यांच्यासोबत असावं. ६० ते ७० टक्के ओबीसी समाज हा भाजपकडे आहे. फुले, शाहू, आंबेडकरांना भाजप मानायला लागले आहेत. ओबीसींना ते सपोर्ट करत असतील तर मला काहीच अडचण नाही."
👉👉 हे देखील वाचा : गडकरी यांच्या घराजवळच वृक्षतोडीचा धक्कादायक प्रकार, सीसीटीव्हीमध्ये कैद
भुजबळांच्या या विधानांमुळे त्यांच्या समर्थकांमध्येही चर्चा रंगली आहे. नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी भुजबळांनी भाजपसोबत जावं, अशी मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. अजित पवार, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे लवकरच भुजबळांची भेट घेणार आहेत.
भुजबळांच्या या विधानांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं निर्माण होण्याची शक्यता आहे. भुजबळांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉👉 हे देखील वाचा : 'भाजप ईव्हीएम सेट करते, महाराष्ट्र संकटात' संजय राऊतांची परखड टीका