नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरात भरदिवसा धाडसी घरफोडीची घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 28 तोळ्यांचे दागिने लंपास केले आहेत. या चोरीची अंदाजे किंमत 16.5 लाख रुपये इतकी आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चोरटे दुचाकीवरून आले आणि घरफोडी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. शिखरेवाडीत अंगण छाया सोसायटीमध्ये राहणारे सुनील गोडसे हे मंगळवारी सकाळी पत्नीला घेऊन नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. त्यांचा मुलगा ओमकार हा कॉलेजला गेला होता. दुपारी जेव्हा तो घरी परतला, तेव्हा त्याला घराचा दरवाजा उघडा दिसला आणि संपूर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले.
ही माहिती मिळताच पोलिसांना तत्काळ कळवण्यात आले. उपनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. चोरीला गेलेल्या दागिन्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे शिखरेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.