बुलढाणा: संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका दुर्मीळ वैद्यकीय प्रकरणाचा सुखद शेवट झाला आहे. 32 वर्षीय महिलेने बुलढाणा शासकीय रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे,या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ असल्याची बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
या महिलेच्या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर, शस्त्रक्रियेअंती या महिलेने निरोगी बाळाला जन्म दिल्याने या महिलेच्या कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून डॉक्टरांनी केलेल्या तज्ज्ञ उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. या नवजात बाळाला आता विशेष वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्याच्यावर लवकरच पुढील उपचार केले जातील.
हेही वाचा: बुलढाण्यात महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटातही बाळ
डॉक्टरांच्या माहितीनुसार, बाळाच्या पोटात आढळलेले बाळ विकसित होत नसल्याने त्याला लवकरच शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाहेर काढले जाणार आहे. सध्या बाळ आणि माता दोघेही स्थिर असून तज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
काय आहे फेट्स इन फेटू ?
‘फेटस इन फेटू’ ही अत्यंत दुर्मिळ घटना असून लाखात एखाद्याच बाळामध्ये अशी स्थिती आढळते. गर्भधारणेदरम्यान जुळ्या भ्रूणांच्या अपूर्ण वेगळेपणामुळे अशा प्रकारची स्थिती उद्भवते. या प्रकरणाने संपूर्ण भारताचे लक्ष वेधले असून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञही या घटनेचा अभ्यास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
ही घटना बुलढाणा जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी वैद्यकीय आश्चर्य ठरली असून पुढील काळात यावर संशोधन होण्याची शक्यता आहे.