Wednesday, September 04, 2024 03:42:33 PM

blast in chemical company
भिवंडीची डोंबिवली होणार ?

डोंबिवलीमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी घटना घडली. यावर प्रशासनाने तात्काळ कारवाईचे निर्देशही दिले परंतु, भिवंडीकडे मात्र प्रशासनाचे अजूनही दुर्लक्ष होत

भिवंडीची डोंबिवली होणार  
bhiwandi blast

१६ जुलै, २०२४ भिवंडी : डोंबिवलीमध्ये रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाल्याने अनेकांचे मृत्यू झाल्याची दुर्दैवी अशी घटना घडली. यावर प्रशासनाने तात्काळ कारवाईचे निर्देशही दिले परंतु, भिवंडीकडे मात्र प्रशासनाचे अजूनही दुर्लक्ष होत आहे. भिवंडी ग्रामीण भागात देखील अनधिकृतपणे अनेक ठिकाणी केमिकल साठा मोठ्या प्रमाणात साठवण्यात येत आहे. यावर प्रशासन कधी कारवाई करेल असा प्रश्नही नेहमी उपस्थित होतो. डोंबिवली सारखी मोठी घटना घडल्यानंतर प्रशासन भिवंडीकडे लक्ष देईल का असा सवाल जनतेतून विचारण्यात येत आहे. भिवंडी तालुक्यातील कटाईबाग परिसरात केमिकलचे अनेक गोदाम आहेत. या अनधिकृत कंपनीमध्ये काम करत असताना दोन ते तीन कामगार भाजून जखमी झाले आहेत. कटाई गावचे सरपंच छाया पाटील आणि माजी सरपंच शरद पाटील यांनी पोलीस आणि ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करत या अनधिकृत केमिकल साठ्याचे गोदाम तात्काळ बंद करण्यात यावे, यासाठी प्रशासनाकडे विनंती केली आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडेही केली आहे. 

कटाई ग्रामपंचायत हद्दीतील अनाधिकृत केमिकल गोदामामुळे गावात संपूर्ण दुर्गंध पसरली आहे आणि अनेकांना आजारही होत आहे. या केमिकल साठ्यांचे नदीकिनारी मोठ्या प्रमाणात साठवण केली जात आहे. केमिकल वाहतूक करतानाही केमिकल रस्त्यावर पडल्याने धूर निघतो. तसेच, या केमिकल ड्रममधून वाफा देखील निघत आहेत. त्यामुळे या परिसरात कधीही मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गावातील वीस हजार जनसंख्या असलेलया नागरिकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ खेळला जात आहे.  प्रशासनाने जर या ठिकाणी लवकरात लवकर कारवाई केली नाही, तर भिवंडीची डोंबिवली झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत. त्यामुळे, या ठिकाणी अनाधिकृत केमिकल साठ्यांवर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ स्वतः रस्त्यावर उतरून केमिकल गोदाम बंद पाडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


सम्बन्धित सामग्री