Bird Flu in Solapur : सोलापुरात पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच, भोपाळ लॅबच्या अहवालातून बाब आली समोर
Bird Flu in Solapur : सोलापूरमध्ये मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि किल्ला बाग परिसरात कावळे, घारी आणि बदकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले होते. या अनैसर्गिक मृत्यूचे कारण अखेर बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज लॅबोरेटरीच्या अहवालात याची पुष्टी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.
बर्ड फ्लूचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि किल्ला बाग परिसराला सतर्क क्षेत्र घोषित केले आहे. या परिसराच्या दहा किलोमीटरच्या त्रिज्येत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. बाधित भागात नागरिकांची अनावश्यक हालचाल आणि प्राण्यांची वाहतूक रोखण्यात आली आहे. तसेच किल्ला बाग आणि कंबर तलाव २१ दिवसांसाठी बंद केले आहे.
बर्ड फ्लू प्राण्यांपासून माणसामध्ये संक्रमित होण्याची शक्यता कमी असली तरी पूर्णपणे नाकारता येत नाही. विषाणू संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात आल्यास किंवा त्यांच्या विष्ठेच्या संपर्कामुळे संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी खास खबरदारी घ्यावी, असे आवाहन सोलापूर आरोग्य विभागाने केले आहे.
हेही वाचा - Satish Bhosale Police Custody: मोठी बातमी! सतीश भोसले उर्फ खोक्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी
कंबर तलाव, किल्ला बाग या बाधित परिसर निर्जंतुक करण्यासाठी दोन टक्के सोडियम हायपोक्लोराइड आणि पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर केला जात आहे. मृत पक्षांचे योग्य पद्धतीने अंतिम संस्कार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना तीन फूट खोल खड्ड्यात पुरण्यात येणार आहे. या ठिकाणी चूना पावडर टाकून संक्रमण रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हेही वाचा - होळीचा रंग मटणच्या स्वादात! ठाण्यात खवय्यांच्या रांगा
पोल्ट्री व्यवसाय आणि पक्षी प्रेमींवर परिणाम
बर्ड फ्लूच्या धोक्यामुळे स्थानिक पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने अद्याप कोणत्याही पक्ष्यांच्या विक्रीवर बंदी घातली नसली तरी नागरिकांना जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. घरगुती पाळीव पक्षी ठेवणाऱ्या नागरिकांनीही त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे असं आवाहन करण्यात आलं आहे.