नाशिक : जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील दुर्गम भागातील पाड्यांवरील वस्तीत कपडे आणि वस्तू वाटप करण्यात आले आहेत. योग गुरु नंदकुमार देसाई व संघजन प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य अभय छल्लाणी हे दरवर्षी प्रमाणे दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर गरजु आदिवासी बांधव व मुलांना वापरात नसलेले कपडे, साड्या, चादरी, विविध वस्तू, पुस्तके, छत्र्या, भांडी, खेळणी इत्यादी साहित्य आदिवासी बांधवांना देण्याचे आवाहन करीत असतात. त्यांच्या आवाहनाला अनुसरून अनेकांनी प्रतिसाद देऊन वस्तूंचे संकलन केले आहे.
या सर्व वस्तू जिल्ह्यातील दुर्गम अशा पेठ, सुरगाणा तालुक्यातील आदिवासी वस्ती असलेल्या पाड्यांवर योग गुरु नंदु देसाई, डॉ. विश्वासराव सावकार, मोहन राजपाल, वासुदेव रोहनकर, दिपक शिर्के, संजय संघवी, प्रदीप पाटील व आदिवासी बांधव यांच्या तर्फे रविवारी २७ ऑक्टोबर रोजी वाटप करण्यात आले.
त्यात प्रामुख्याने १५०० साड्या, पँट्स, शर्ट्स व टी-शर्ट्स मिळून सुमारे ९०० नग, लहान मुलांचे व मुलींचे १४०० ड्रेस, छत्र्या, बॅग्स, बूट, पर्स, खेळणी, भांडी इत्यादी वस्तूंचा समावेश होता. म्हसगाव, चौकडी, वडपाडा, बेलपाडा ही पेठ तालुक्यातील गावे व कहांडोळपाडा, आंगण वाडी सुरगाणा तालुक्यातील गावातील पाड्यांवरील वस्तीत आदिवासी बांधव तसेच लहान मुले व मुली यांस वरील वस्तू मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. जणू काही त्यांची दिवाळीच साजरी होत असल्याचे वातावरण यावेळी निर्माण झाले.