२० ऑगस्ट, २०२४, कल्याण : बदलापूरमध्ये एका नराधमाने कोवळ्या जीवांना ओरबाडलं आहे. बदलापूरच्या नावाजलेल्या शाळेत शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार करण्यात आला आहे.
यातील एक चिमुकली चार वर्षांची, तर दुसरी सहा वर्षांची आहे. शाळेतल्या सफाई कामगार नराधमाकने चिमुकल्यांवर अत्याचार केले. या प्रकरणात पोलिसांनी सफाई कामगाराला प्राथमिक चौकशीअंती अटक केली. अटकेतील आरोपीचं नाव अक्षय शिंदे असं आहे.
धक्कादायक घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. सकाळचे वर्ग सुरू असताना नराधमाने हे कृत्य केलं. मुलींनी घरी परतल्यावर हिंमत करुन पालकांना माहिती दिली. सगळी माहिती कळताच पालकांना धक्का बसला.
मुली शौचालयात गेल्या असता नराधमानं त्यांच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचं उघड झालं. दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय. पीडित मुलींच्या पालकांनी घडल्या प्रकाराची माहिती शाळेला कळवली. शाळेकडे तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली. शाळेत तक्रार केल्यानंतर पालकांनी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार केली. चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला असताना पोलिसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास दिरंगाई झाल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि या प्रकरणाला आंदोलनाचं स्वरुप मिळालं.याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. मात्र या प्रकारानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्या मनातही आपल्या पाल्याच्या सुरक्षेसंदर्भात भितीचं वातावरण असून शाळा अधिक सुरक्षित असाव्यात आणि घडलेल्या प्रकरणात तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.सध्या आरोपी अक्षय शिंदे अटकेत आहे. तक्रार नोंदवून घेण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकाचे निलंबन झाले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी महिला आयपीएस आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हे पथक प्रकरणाचा तपास करेल.