नवी दिल्ली, १० मे २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्यात तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन दिला. सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना १ जूनपर्यंत जामीन दिला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करण्याची संधी मिळावी यासाठी केजरीवालांना जामीन देण्यात आला आहे. जामिनावर असताना खटल्याशी संबंधित विषयावर लिहू, बोलू अथवा कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना बजावले आहे. ईडीने केजरीवाल यांना जामीन देण्यास विरोध केला होता. निवडणुकीत प्रचार करायचा आहे, हा जामीन मिळवण्याचा निकष असू शकत नाही, असे ईडीचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा ऐकून घेतला पण केजरीवाल यांना १ जूनपर्यंत जामीन दिला.