Friday, July 05, 2024 02:43:10 AM

महाराष्ट्राच्या अनेक भागांना अवकाळीचा फटका

महाराष्ट्राच्या अनेक भागांना अवकाळीचा फटका

मुंबई, १२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र येत्या १५ तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे फळबागांची विशेषतः लिंबू, संत्रा, आंबा, केळी बागांची पुरती दैना उडाली आहे, तसेच रब्बी, उन्हाळी पिकांसह भाजीपाला पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीची तीव्रता आणि क्षेत्र वाढत चालले आहे. पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. अकोला जिल्ह्यात वादळ व गारपिटीने पिके जमीनदोस्त झाली आहेत.

राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. विदर्भातल्या अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची बच्चू कडू आणि नवनीत राणा यांनी पाहणी केली. वर्ध्यासह समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. त्याचा फटका भाजीपाला वर्गीय पिकांसह फळपिकांनाही बसला. पावसासह असलेल्या वाऱ्यानेही मोठे नुकसान केले. बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेला शेतमालही ओला झाला. शेतात असलेले टरबूज फुटले तर तीळाचे पीक जमीनदोस्त झाले.

अवकाळी पाऊस, गारपीटने वर्ध्यातील अल्लीपुर शिवारात पीक उद्ध्वस्त झालंय.. गारांच्या तडाख्याने टरबूज डांगर तसचं इतर फळ, भाजीपाला, उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..अल्लीपुर येथील शेतकरी ज्ञानेश्वर उगेमुगे यांनी तीन ते साडेतीन एकरमध्ये टरबुज पिकांची लागवड केली. जवळपास तीन लाख रुपये खर्च केला. पिकाचा थेट बांधावरून विक्रीचा सौदा झाला. सकाळी टरबुज तोडणार आणि व्यापारी येऊन जाणार, चार पैसे पदरी पडतील, असं असताना मंगळवारी पहाटे गार झाली आणि पीक उध्दवस्त झालं.. टरबुजाला अक्षरशः तडे गेले.. शुक्रवारी रात्री गारपीट झाली आणि त्यात पीक उध्वस्त झालं. दीपक कलोडे यांच्या शेतातील डांगर मातीमोल झालं.. अशीच स्थिती या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची आहे.. शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय.. तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस, गारपिटीने हिरावला.. या नुकसानीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय.. सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे ..

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, नांदुरा आणि खामगाव तालुक्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची पिके नासवली आहेत.. झालेल्या गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतात उभे असलेले पीक जमीनदोस्त झाला आहे. परवा झालेल्या गारपिटीने तब्बल ३०९ कुटुंबे बेघर केली आहेत. तर. सहा तालुक्यात साडेतीन हजार हेक्टर शेती पिकाचे नुकसान केले आहे. हे नुकसान काय कमी होत तर आज पुन्हा एकदा मोताळा तालुक्यातील बोरखेडी, अंत्री शिवारात प्रचंड गारांचा पाऊस झाला.. ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील मका, ज्वारी, यासह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. परवा आलेल्या पावसाने तब्बल १०२ गावे बाधित झाली असून पुन्हा आजच्या पावसाने शेतकऱ्यांना रडवलं आहे.

हाती आलेल्या कापूस, हरबरा, आणि सोयाबिनला भाव नाही.. पालेभाज्यांचेही तेच हाल त्यामुळे सुलतानी संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आभाळ कोसळलं आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर निघण्यासाठी शेतकरी सरकार मायबाप कडे डोळे लाऊन बसलाय.. या नुकसानीतून किमान लागवडीचा तरी खर्च भरून निघावा इतकी मदत सरकार केली तर शेतकरी आर्थिक दरीत कोसळणार नाही अशा भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातही अनेक ठिकाणांना वादळी पाऊस, गारपिटीने झोडपून काढले. या पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्हयात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अचानकच्या आलेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर फळबागांचे ही यात नुकसान झाले आहे. सोयगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात वीज पडून एका गायीचा मृत्यू झालाय तर आज पैठण तालुक्यातील अंबड टाकळी येथे एका शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

सिल्लोड, कन्नड, सोयगाव तालुक्यातील काही भागात जवळपास अर्धा तास विजांच्या कडकडाटांसह वादळ, अवकाळी पाऊस अन् अधूनमधून गारपीट झाली. गारपिटीमुळे मल्चिंग पेपर फाटून उन्हाळी मिरचीचे मोठे नुकसान झाले. तसेच काढणीला आलेल्या ज्वारी, बाजरी, मका पिके आडवी पडली. गुरांचा चारा भिजला. आंब्यांच्या कैऱ्यांच सडा पडला असून फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सायंकाळच्या सुमारास अर्धा तास जोरदार वाऱ्यासह मोठा धुराळा उडाला. सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद, आसडी, सारोळा, अन्वी, डोंगरगाव पालोद, अन्वी परिसरामध्ये अर्धा तास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली.सर्वत्र गारांचा सडा पडला होता. अनेक ठिकाणी पूर्व हंगामी मिरचीची लागवड झालेली आहे. अवकाळीच्या सरी व गारपीटीमुळे लागवड या मिरची पिकाला फटका बसणार आहे. तर पशुधनासांठी जमा करून ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान झाले. सिल्लोड,सोयगाव तालुक्यात जोरदार पावसासह सोसाट्याचा वारा आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे पीकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. तर फळबागांना देखील याचा फटका बसला आहे. तरी आता शासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.

हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळीवाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीड,लातूर, धाराशिव, सांगली, परभणी, आणि सोलापूर मध्ये वादळीवारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.अवकाळीमुळे होत्याचं नव्हतं झालंय शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय फळबागा उध्वस्त झाल्यात, घरावरचे पत्रे उडालेत, तर काही ठिकाणी गारांचा खच पडलाय, तर वीज पडून दुधाळ जनावरे देखील जागीच दगावली आहेत त्यामुळे अवकाळीने मोठा कहर केलाय.

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्याला अवकाळी चा मोठा फटका बसला आहे. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मुळज या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. वादळी वाऱ्यासह, आणि विजांच्या कडकडाटासह या अवकाळीच्या तडाख्यात उमरगा तालुक्यातील सहा जनावरे दगावले आहेत त्यात दुधाळ जनावरांचा देखील समावेश आहे. एकट्या उमरगा तालुक्यात फळपिकांचे ५० हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे त्यामध्ये आंबा, केळी ,पपईचा समावेश आहे. तर बागायती पिकांचे ४० हेक्टरवर नुकसान झाले आहे त्यामध्ये कांदा पानमळे आदीचा समावेश आहे. जिरायत पिकांचे देखील १०० हेक्टरवर नुकसान झाले आहे त्यामध्ये ज्वारीचा समावेश आहे..

परंडा तालुक्यात देखील अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंडा तालुक्यात दोन वासरे दगावली आहेत. आणि पंधरा घरांची अंशतः पडझड झाली आहे. तर दहा हेक्टर फळ पिकांचे नुकसान झाले आहे. परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथील विठ्ठल त्रिंबक तिपाले यांच्या २ एकर दोडका बागेचे नुकसान झाले आहे. दोडका बागेला आत्तापर्यंत २ लाखांचा खर्च आला होता. दोडक्याला प्रतिकीलो २५ ते ३५ रूपये किलोचा बाजार भाव मिळतोय त्यामुळे यावर्षी दोडक्याचे चांगले पैसे होतील असे वाटत होते १० एप्रिलच्या रात्री सव्वा दहा वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दोडक्याचा मंडप पडला, अक्षरक्ष: जमिनदोस्त झाला.


सम्बन्धित सामग्री