Friday, July 05, 2024 02:53:00 AM

बसवराज पाटील भाजपात

बसवराज पाटील भाजपात

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी मंत्री, औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. बसवराज पाटील यांनी सोमवारी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि मंगळवारी भाजपात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बसवराज पाटील त्यांचे बंधू बापुराव पाटील, चिरंजीव शरण पाटील यांच्यासह बसवराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. बसवराज यांनी ४५ वर्षांची काँग्रेससोबतची साथ सोडली.

माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून बसवराज पाटील परिचित आहेत. बसवराज पाटील यांचा परिवार मागच्या ४५ वर्षापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिला. बसवराज पाटील यांचे वडील माधवराव पाटील हे २५ वर्षे मुरुम नगर परिषदेचे अध्यक्ष होते. बसवराज पाटील यांनी १९८२ मध्ये युवक काँग्रेस उमरगा तालुका अध्यक्ष म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांची १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. ते जिल्हा परिषद धाराशिवचे उपाध्यक्ष झाले. यानंतर ते १९९९ मध्ये उमरगा - लोहारा मतदारसंघातून विधानसभेवर गेले. शिवराज पाटील यांच्या आशीर्वादाने ग्रामविकास राज्यमंत्री झाले. मरगा लोहारा विधानसभा आरक्षित झाल्यानंतर २००९ मध्ये लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. नंतर २०१४ मध्येही औसातून निवडून आले. काँग्रेस पक्षात संघटनेच्या पातळीवर बसवराज यांची कामगिरी सातत्याने चांगली राहिली. याच कारणामुळे त्यांचा लातूरमधून लोकसभेच्या उमेदवारीसाठी विचार सुरू होता. पण उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी भाजपात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ बसवराज काँग्रेस सोडून भाजपात गेले. यामुळे मराठवाड्यात काँग्रेसच्या राजकारणाला धक्का बसला आहे.


सम्बन्धित सामग्री