Tuesday, July 02, 2024 09:04:18 AM

शरद पवारांनी दोन दिवसात भूमिका बदलली

शरद पवारांनी दोन दिवसात भूमिका बदलली

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  शिवबा संघटनेचे अध्यक्ष मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. जालन्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची भेट घेतली आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायदेशीर हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच आता खासदार शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा फॉर्म्यूला सांगितला आहे.

जळगावातील पत्रकार परिषदेत बोलताना खासदार शरद पवार म्हणाले की, घटनेत आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ती मर्यादा १५ ते १६ टक्क्यांनी वाढवायला हवी. केंद्रातील मोदी सरकारने याबाबतची घटना दुरुस्ती केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा सुटेल, असं म्हणत शरद पवारांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे टोलवला आहे. याशिवाय मराठा समाजाचा ओबीसी कोट्यात समावेश करणं हा गरिब ओबीसींवर अन्याय होईल. याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षणाची मर्यादाच वाढवायला हवी, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

राज्यातील इतर मागास वर्गीय आणि अन्य समाजाला लोकांमध्ये आरक्षणावरून मतभेद व्हायला नकोत. असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्यांना आमचा पाठिंबा राहणार नाही, असंही खासदार शरद पवारांनी म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे काही प्रतिनिधी आज जालन्यातील आंतरवली सराटी या गावात आंदोलकांचे प्रमुख मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे. त्यामुळं आजच्या बैठकीत मराठा आरक्षणावर काय चर्चा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.


सम्बन्धित सामग्री