पुणे, १० मे २०२४, प्रतिनिधी : नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल तब्बल दहा वर्षांनंतर आला. दाभोलकरांची हत्या पुण्यात २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी झाली होती. या प्रकरणाचा तपास आठ वर्षे आणि खटला अडीच वर्षे सुरू होता. पुण्याच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेतली आणि निकाल दिला. न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणात पाच आरोपींपैकी तीन जणांची निर्दोष मुक्तता केली तर दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच लाखांचा दंड तर डॉ. विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या तीन जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
'उच्च न्यायालयात दाद मागणार'
दाभोलकर हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या तीन जणांच्या विरोधात मुंबईच्या उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे दाभोलकर कुटुंबाकडून सांगण्यात आले.