Friday, July 05, 2024 02:57:00 AM

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई, २८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान पार पडत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर आता तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यासाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रामध्ये घेण्यात येणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत होणाऱ्या ६, ७ आणि १३ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आल्या आहेत. यासंदर्भातील माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी मतदारसंघांपैकी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं मतदान १३ मे रोजी पार पडत आहे. पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईमधल्या एकूण ६ मतदारसंघांमध्ये मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणत्याही परीक्षा घेतल्या जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या सुधारित तारखांची माहिती एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. या परिपत्रकानुसार, ६ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा आता १८ मे रोजी होणार आहे. तर ७ मे रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा २५ मे रोजी धेण्यात येणार आहेत. तसेच १३ मे रोजी ज्या परीक्षा घेण्यात येणार होत्या, त्या थेट ८ जूनला होणार असल्याची माहिती आहे. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ परीक्षांच्या तारखांमध्येच बदल करण्यात आला आहे. परीक्षेची वेळ आणि केंद्र यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे वेळापत्रक मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांना लागू असणार, असं विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.


सम्बन्धित सामग्री