छत्रपती संभाजीनगर, २८ एप्रिल २०२४ , प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात १३ मे (सोमवार) रोजी मतदान होणार आहे. त्या दिवशी आपल्या आस्थापनेतील कामगार, कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून पगारी सुटी देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात व जिल्ह्यात १३ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी स्थानिक सुटी असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 'लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या परिच्छेद १३५ बी'नुसार मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी मतदानासाठी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मतदारसंघातील कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना आणि कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. ही सुटी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू असणार आहेत.