पुणे, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : एका गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराचा पाठलाग करीत मुळाशी तालुक्यातील मुठा गावात पोचलेल्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकावर या गुन्हेगाराने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. दरम्यान प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील पाठोपाठ एक अशा सलग तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांनी त्याच्या गोळीबाराला न जुमानता गाडी दुचाकीला आडवी घालत त्याच्या आणि साथीदाराच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या पोलीस पथकाला शाबासकी देत एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
नवनाथ निलेश वाडकर (वय १८, रा. जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. केतन साळुंखे हा स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे.तर वाडकर सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वाडकर हा साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.