Sunday, June 30, 2024 09:11:30 AM

आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत 'स्वराज्य' आक्रमक

आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत स्वराज्य आक्रमक

पुणे ,२३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या वतीने आरटीई (RTE) प्रवेश प्रक्रियेच्याबाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकाच्या विरोधात स्वराज्य संघटनेच्यावतीने शिक्षण आयुक्त कार्यालयात शाळेतील घंटा वाजवून निवेदन देण्यात आले. शासनाने काढलेल्या परिपत्रकामुळे गरिब विद्यार्थ्यांना आरटीई (RTE) अंतर्गत खाजगी शाळेत प्रवेश मिळण्यास अडचणी येणार आहेत. तसेच विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणापासून १ किलोमीटर अंतरावर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत प्रवेश मिळणार नसल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे प्रवेश सुरु झाले असून अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आरटीई (RTE) प्रक्रियेत सहभागी झालेल्या नाहीत. यामुळे आर्थिकदृष्ट्या गरिब विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळेत शिक्षण घ्यायचेच नाही का? असा सवाल स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी उपस्थित केला.

स्वराज्य संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या :
१. पालक राहत असलेल्या १ किलोमीटर हद्दीत शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास विद्यार्थ्यांना आरटीई (RTE) खाजगी शाळेत प्रवेश घेता येणार नाही ही अट रद्द करावी.
२. सध्या अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा आरटीई (RTE) ऑनलाईन पोर्टलवर दिसत नाहीत, त्यांचा यादीत तात्काळ सहभाग करावा.
३. खाजगी शाळांना पुन्हा आरटीई (RTE) प्रक्रियेत भाग घेण्यासाठी सक्ती करावी.
४. शासनाच्या वतीने खाजगी शाळांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे.
५. खाजगी शाळांना सरकारच्या वतीने प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरीता स्वतंत्र प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करून ऑडिट करावे.

डॉ. धनंजय जाधव यांनी म्हटले की, 'एकीकडे देशामध्ये मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा आहे, तर दुसरीकडे गरिब विद्यार्थ्यांचा खाजगी संस्थांतील शिक्षणाचा हक्क शासन काढून घेत आहे. शासनाने परिपत्रक रद्द करावे अन्यथा प्रवेश प्रक्रिया स्वराज्य थांबवेल असा इशारा देण्यात येत आहे.'

यावेळी स्वराज्य सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश सोनवणे, राजू फाले, विजय जरे, संजय ठाकरे, संकेत सोनवणी, Adv. वाजेद खान, लक्ष्मण वडणे, विनायक चिवे, दादाराव बोबडे, द्वारकेश जाधव, विक्रम कदम, कुणाल शिंदे, गणेश गवळी, प्रणय शेंडे, ओमकार गायकवाड, माऊली बोबडे, मंगेश भोसले, अभय बारगुजे, प्रदीप टेकाळे, किशोर तेलंग, रोहित शिंदे, अजित बाबळसुरे, शुभम देसाई, राहूल खराडे, आकाश घोटकुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


सम्बन्धित सामग्री