Wednesday, July 03, 2024 02:57:23 AM

मराठवाड्यात तब्बल १ हजार १४३ गावांत टँकर सुरू

मराठवाड्यात तब्बल १ हजार १४३ गावांत टँकर सुरू

मराठवाडा, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहेत. आठवडाभरात तहानलेल्या गावांची आणि टँकरचीही संख्या तब्बल दोनशेने वाढली आहे. गेल्या आठवड्यात ९२४ गावे आणि वाड्यांना १ हजार ५८ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात वाढ होऊन तहानलेल्या गावे व वाड्यांची संख्या १ हजार १४३ तर टँकरची संख्या १ हजार २६६ एवढी झाली आहे. प्रशासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी टँकर भरण्यासाठी जमिनीत तरी पाणी पाहिजे, यासाठी आता पाणीच जपून वापरण्याची वेळ आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३५४ गावे व ५८ वाड्यांमध्ये ५४८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालना जिल्ह्यातील २४७ गावे व ६१ वाड्यांमध्ये ३७२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.बीडमध्ये १९३ गावे व १५२ वाड्यांत २३५, परभणीत एका गावात एक, नांदेडमध्ये दोन गावे व १० वाड्यांमध्ये १२, लातूरमध्ये ८ गावे २ वाड्यांत ९ तर धाराशिव जिल्ह्यात ५५ गावांत ८९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.पाणीटंचाई निवारण्यासाठी काही ठिकाणी टँकरची सोय करण्यात आली. तसेच मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत टंचाई निवारण्यासाठी १,७७५ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या विहिरीतून टँकर व टँकर  व्यतिरिक्त पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी ६२२ तर टँकर  व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी ११५३ विहिरी अधिग्रहीत आहेत.


सम्बन्धित सामग्री