Tuesday, July 02, 2024 08:59:11 AM

राज्यात उष्णतेची लाट

राज्यात उष्णतेची लाट

पुणे, १७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आली असून हवामान विभागाकडून कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यासाठी पुढचे काही तास अतिशय महत्त्वाचे असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाच्या प्रमुखांनी व्यक्त केला. गेल्या दोन ते तीन दिवसात प्रत्येक जिल्ह्यात उष्णतेचा प्रकोप वाढताना दिसत आहे. त्याचा जास्त प्रभाव विशेषत: कोकणात दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन दिवसात कोकणातील बहुतांश जिल्ह्यात ठाणे, रत्नागिरी, पालघर,मुंबई, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वावरताना विशेष काळजी घ्यावी. दुपारी १२ ते ४ वाजताच्या दरम्यान नागरिकांनी बाहेर पडू नये. पुरेसे पाणी घ्यावे. उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असे हवामान खाताच्या प्रमुख मेधा खोले यांनी नागरिकांना सांगितले आहे.


उष्णतेची तीव्रता १७ एप्रिलला जास्त आहे. दोन ते तीन दिवसात हळूहळू कमी होईल. तीव्रता जरी कमी झाली तरी उष्णता राहणार आहे. त्यामुळे कोकणात दोन दिवसानंतर ऑरेंज ऐवजी यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील दक्षिण जिल्ह्यांमध्ये म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच विदर्भ, मराठवाडा ह्या सगळ्या भागांमध्ये उष्णतेची लाट असण्याची शक्यता आहे. या उष्णतेमुळे विदर्भ आणि मराठवाडा दोन ते चार दिवसानंतर वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असेही खोले यांनी सांगितले आहे. वातावरणातील आदर्ता कमी झाल्यामुळे उष्णता वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून गुजरात आणि राजस्थानकडून उष्ण आणि कोरडे वारे वाहू लागले. त्यामुळे वातावरणातील आदर्ता वाढल्याने असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


सम्बन्धित सामग्री