Sunday, September 29, 2024 03:00:04 AM

पुण्यात तयार झाली तब्बल 'दहा हजार किलोची मिसळ'

पुण्यात तयार झाली तब्बल दहा हजार किलोची मिसळ

पुणे , ११ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने आयोजन ; अयोध्येत विश्वविक्रमी शिरा बनविण्यासाठी वापरलेली भव्य कढई पहिल्यांदाच मिसळ करण्याकरिता पुण्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी वापरली
तब्बल १५ बाय १५ फूट आणि ६.५ फूट उंच अशा तब्बल २५०० किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये पुण्यात १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली. क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंज पेठेतील महात्मा जोतीबा फुले वाडा येथे राबविण्यात आला.

अयोध्येत तब्बल ७ हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी ही १० हजार किलो मिसळ तयार केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, मुरलीधर मोहोळ, बाळासाहेब शिवरकर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला. प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, नंदा पंडित, सारंग सराफ, रवी चौधरी, सुशीला नेटके, विजय रजपूत, एकनाथ ढोले, बाळासाहेब अमराळे, सुनीता काळे, संतोष पंडित, पीयूष शहा, रुपेश चांदेकर, महेंद्र मारणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला.

उपक्रमामध्ये १० हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १००० किलो, कांदा ८०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला १४० किलो, लाल मिरची पावडर ४० किलो, हळद पावडर ४० किलो, मीठ ५० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र ७ किलो, फरसाण २५०० किलो, पाणी १०००० लिटर, कोथिंबीर १२५ जुडी, लिंबू १००० नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले. तसेच मिसळ खाण्याकरिता डिस्पोजेबल डिश ५० हजार, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास ५० हजार यांसह स्लाईड ब्रेड १.५ लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री