Tuesday, July 02, 2024 09:22:12 AM

पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी चौघे जेरबंद

पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी चौघे जेरबंद

महाबळेश्‍वर, ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाबळेश्‍वरमध्ये पिसोरी हरणाची शिकार केल्याप्रकरणी सातारा वनविभागाने चौघांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली गावठी बंदुक व बंदुकीने मारलेले पिसोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सहाय्यक वनसंरक्षक, सातारा, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) महाबळेश्‍वर, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) मेढा व इतर वनकर्मचारी हे सामुहिक रात्र गस्त करित असताना मोळेश्‍वर फाटा ते सहयाद्री नगर (राजमार्ग रस्ता) रस्त्यावर राखीव वनातील फॉ. कं.नं. २८४ मध्ये दोन संशयित इसम रस्त्यावर आढळून आल्याने त्यांची चौकशी व तपास केला असता त्यांच्या जवळ पिशवी आढळून आली. पिशवी मध्ये वाघर, कोयता, काडतुस इ. वस्तु सापडल्याने ते इसम शिकारी असल्याचा संशय बळावला. त्यावरुन त्यांची कसून चौकशी केली असता इतर दोन आरोपींचा शिकारी मध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले त्यावरुन सदरच्या आरोपी यांचेकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली गावठी बंदुक व बंदुकीने मारलेले पिसोरी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

शिवाजी चंद्रकात शिंदे, मु.पो. कुरोशी ता. महाबळेश्‍वर जि. सातारा, दिपक शंकर शिंदे, मु.पो. कुरोशी ता. महाबळेश्‍वर जि. सातारा, गणेश कोंडिबा कदम, मु.पो. गोगवे ता. महाबळेश्‍वर जि. सातारा आणि आदित्य दिपक शिंदे, मु.पो. कुरोशी ता. महाबळेश्‍वर जि. सातारा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चारही आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ चे कलम ९,३९,5५० व ५१ नुसार कारवाई करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री