Saturday, October 05, 2024 02:35:52 PM

सांगलीत पोलिसांची १२ दुचाकींवर कारवाई

सांगलीत पोलिसांची १२ दुचाकींवर कारवाई  

सांगली, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : सांगली शहरात सायलेन्सरमध्ये बदल करून फटफट आवाज करत फटाके फोडणाऱ्या दुचाकी वाहनांविरुद्ध सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाई केली आहे.रात्री अचानक चार तासांच्या लावलेल्या नाकाबंदीमध्ये तब्बल १२ बुलेट ताब्यात घेतल्या गेल्या. या कारवाई दरम्यान पोलीस अधीक्षकानी रस्त्यावर उतरून कारवाईचा आढावा घेत वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकाला सक्त पध्दतीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

सांगली शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुसाट दुचाकी स्वारांनी उच्छाद मांडला होता. रात्रीच्या वेळेस रस्त्यावर वेगाने बुलेट जाताना फटाके फोडल्यासारखा आवाज आल्यामुळे अनेकांना त्रास होत होता. तसेच संबंधित दुचाकीस्वार वेगाने जात असल्यामुळे त्यांचा पाठलाग करून कारवाई करणेही अवघड बनले होते. याबाबाबत थेट पोलीस अधीक्षकांकडे काही तक्रारी आल्यावर कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक घुगे यांनी दिले होते. या कारवाईसाठी स्वतः पोलीस अधीक्षक रस्त्यावर उतरले. सात ते आठ जणांच्या पथकाने रात्री ९ ते मध्यरात्री एकपर्यंत नाकाबंदीची मोहीम राबविली. त्यानंतर पथकाने कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या १२ दुचाकी ताब्यात घेतल्या. या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून फटाक्यासारखा आवाज केल्याचे निदर्शनास आले. संबंधित दुचाकीचे सायलेन्सर काढण्यात आले. दुचाकीच्या मालकांना नवीन सायलेन्सर आणून बसविण्याच्या सूचना दिल्या. तसेच मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार परवाना नसणे, विमा उतरविला नसणे आदी केसेसनुसार दंडात्मक कारवाई केली. दीड हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई केली.

                 

सम्बन्धित सामग्री