Sunday, October 06, 2024 03:03:09 AM

तुकाराम महाराज बीज सोहळ्यात पथारीवाले, फेरीवाल्यांना ‘मनाई’

तुकाराम महाराज बीज सोहळ्यात पथारीवाले फेरीवाल्यांना ‘मनाई’

पिंपरी, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी: संत तुकाराम महाराज बीज सोहळा बुधवारी (दि. २७) होणार आहे. सोहळ्यानिमित्त देहूगाव येथे दरवर्षी दोन ते तीन लाखांपर्यंत वारकरी आणि भाविक हजेरी लावतात. देहू येथील मंदिर आणि मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. सोहळ्या दरम्यान संत तुकाराम महाराज मंदिर आणि मंदिर परिसरात फळे-फुले विक्रेते, खेळणी विक्रेते, इतर विक्रेते, व्यावसायिक हातगाडी लावून तसेच फिरून विक्री करतात. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या भाविक आणि वारकरी यांना पथारीवाल्यांचा त्रास होण्याची शक्‍यता आहे.

पथारीवाले, हातगाडीवाले यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन चेंगराचेंगरी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने देहुगाव येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, वैकुंठ मंदिर परिसर, देहुगाव मुख्य कमान ते १४ टाळकरी कमान या रस्त्यावर तसेच मुख्य मंदिरा समोरील रस्ता ते १४ टाळकरी कमान ते वैकुंठ मंदिर रस्ता, भैरवनाथ चौक या परिसरात मंगळवारी (दि. २६) रात्री १२ ते बुधवारी (दि. २७) रात्री बारा या कालावधीत सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव फेरीवाले, पथारीवाले, पानटपऱ्या यांना बसण्यास व फिरण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.


सम्बन्धित सामग्री