Saturday, October 05, 2024 02:38:57 PM

अभिनेता गोविंदाची पुन्हा होणार राजकीय एन्ट्री?

अभिनेता गोविंदाची पुन्हा होणार राजकीय एन्ट्री

बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री करणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेता गोविंदाने वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदा याने यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी लोकांनी त्याला निवडूनही दिले होते. त्यानंतर आता गोविंदाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं तो पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून सध्या महाविकास आघाडीकडून अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली होती. याठिकाणी विद्यमान खासदार गजानन किर्तीकर हे शिवसेना शिंदे गटात आहेत. मात्र अमोल किर्तीकर निवडणुकीत समोर असल्याने गजानन किर्तीकरांनी ही जागा लढवण्यास नकार दिला. त्यामुळे आता या जागेवर उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. त्यात अभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

याआधी गोविंदाने उत्तर मुंबईच्या जागेवर २००४ साली भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे गजानन किर्तीकरांच्या जागेवर गोविंदा यांना शिवसेनेकडून संधी दिली जाईल असंही बोलले जात आहे. या मतदारसंघात उत्तरेकडील लोकांची संख्या जास्त आहे. त्यात सिनेकलाकार म्हणून गोविंदा यांना इथं फायदा होऊ शकतो. त्यात महायुतीचे पाठबळ मिळालं तर गोविंदा यांना चांगली मते पडतील अशीही चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे. सध्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र लवकरच याबाबत स्पष्टता येईल.


सम्बन्धित सामग्री