Sunday, July 07, 2024 10:13:05 PM

'पर्यावरणपूरक विकासासह स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य'

पर्यावरणपूरक विकासासह स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य

सातारा, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : गोड्या पाण्यातील देशातील सर्वात मोठे कोयना जल पर्यटन केंद्र आहे. या माध्यमातून पर्यावरणपूरक विकास आणि स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सातारा जिल्ह्यातील मुनावळे येथे कोयना जलाशय तीर येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाच्या कोयना जल पर्यटन शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांच्या रोजगारास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.

सह्याद्रीच्या कुशीत प्रचंड निसर्ग सौंदर्य लपलेले आहे. त्याला चालना देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता होती. त्यासाठी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट काढल्याने या परिसराच्या विकासाला चालना मिळाली आहे. मासेमारी, बोटिंग, जल पर्यटनासाठी या बाबीचा फायदा होणार आहे. मात्र, विकास करत असताना तो कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणपूरक असला पाहिजे. पाणी प्रदूषित होता कामा नये. तसेच स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, अशा सूचना पर्यटन विभागाला आपण दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. स्थानिक बोट व्यावसायिकांना बोट खरेदीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपटी ते तापोळा तसेच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रघुवीर घाटातील रस्ता लवकर पूर्ण करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री