Friday, July 05, 2024 04:03:18 AM

पैठणचे ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होणार

पैठणचे ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ होणार

मुंबई, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. यावेळी दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे सहभागी झाले होते. या उद्यानाच्या विकास कामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीच्या शिफारशीनुसार विकास कामांच्या प्रस्तावात सुधारणा करून १४९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव करण्यात आला.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत.  मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासाठी १५० कोटीचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती.

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित व सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार निवडीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागारांना त्यांच्या कार्याला आरंभ करण्याचा आदेश देखील देण्यात आला आहे. यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.


सम्बन्धित सामग्री