वॉशिंग्टन, २५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : अमेरिकेत यावर्षी (२०२४) नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी अध्यक्षपदाच्या दावेदारांनी आपला निवडणूक प्रचार तीव्र केला आहे. दरम्यान, दक्षिण कॅरोलिनामध्ये झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची प्रतिस्पर्धी निक्की हेली यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होण्याच्या दिशेने जोरदार पावले उचलली असून आता पुढे त्यांचा सामना जो बिडेन यांच्याशी होणार आहे.
निवडणुकीच्या रणधूमीत अमेरिकेतील जनतेने लोकांनी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना जोरदार पाठिंबा दिला. गुन्हेगारी आरोप असूनही, ट्रम्प यांनी येथे मोठी आघाडी घेतली. विशेष म्हणजे दोन वेळा गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकलेल्या दक्षिण कॅरोलिनाच्या मूळ रहिवासी असलेल्या हॅली यांना ट्रम्प यांचा पराभव करता आला नाही. त्यामुळे या पराभवानंतर ते अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता बळावली आहे.