Friday, July 05, 2024 01:08:53 AM

नवनीत आणि रवी राणा यांच्या लग्नाची गोष्ट

नवनीत आणि रवी राणा यांच्या लग्नाची गोष्ट

अमरावती, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केली म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा या दांपत्याला आता कोण ओळखत नाही ? जनसंपर्क वाढवण्यासाठी केलेले अभिनव उपक्रम, जनहिताची कामं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असलेले हे राजकारणी दांपत्य शुक्रवारी पुन्हा चर्चेचा विषय झाले. निमित्त ठरले लग्नाच्या वाढदिवसाचे. नवनीत कौर आणि रवी राणा यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी लग्न केले. शुक्रवार २ फेब्रुवारी २०२४ रोजी या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने राणा दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नवनीत राणा यांचे माहेरचे नाव नवनीत कौर. मुंबईत पंजाबी कुटुंबात त्यांचा ३ जानेवारी १९८६ रोजी जन्म झाला. वडील सैन्यात होते त्यामुळे कळत नकळत अंगी कडक शिस्त बाणवली गेली. उत्तम संस्कार झाले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर नवनीत यांनी मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. निवडक म्युझिक अल्बम केले. नंतर तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम, पंजाबी, हिंदी चित्रपटांमधून मनोरंजनसृष्टीत नशीब आजमावले.

नवनीत कौर योग आणि ध्यानधारणेसाठी उत्तराखंडमध्ये हरिद्वार येथे गेल्या होत्या. काही काळ योगगुरू रामदेव बाबा यांच्या आश्रमात राहिल्या होत्या. याच काळात राजकारणात सक्रीय असलेले रवी राणा रामदेव बाबा यांच्या आश्रमात योगसाधनेसाठी गेले होते. आश्रमातच रवी राणा आणि नवनीत यांची भेट झाली. ओळख वाढली. ओळखीचे रुपांतर हळू हळू प्रेमात झाले. पण घरून लग्नाला विरोध होत होता. वेगवेगळ्या वातावरणातील असल्यामुळे हा विरोध सुरू होता. पण विरोधाला झुगारून देत रवी राणा आणि नवनीत यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २ फेब्रुवारी २०११ रोजी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले. या सोहळ्यात ३१६२ जोडप्यांनी लग्न केले.

आमदार रवी राणा आणि नवनीत यांच्या या लग्न सोहळ्यात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू बाबा रामदेव, सहारा प्रमुख सुब्रत रॉय आणि विवेक ओबेरॉय हे प्रमुख पाहुणे होते. लग्नानंतर राणा दाम्पत्याने रामदेव बाबांचा आशीर्वाद घेतला. राणा दाम्पत्याने सामूहिक लग्न करून मोठा खर्च टाळला आणि तो पैसा गरीबांच्या कल्याणासाठी राबवल्या जात असलेल्या योजनांकरिता दान केला. लग्नानंतर रवी राणा यांच्यासोबत नवनीत राणा पण सार्वजनिक जीवनात सक्रीय झाल्या. त्यांनी राजकारणात पदार्पण केले. सध्या रवी राणा अपक्ष आमदार आणि नवनीत राणा अपक्ष खासदार म्हणून महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातील जनतेसाठी काम करत आहेत. जनतेची सेवा करत असल्यामुळे राणा दाम्पत्य नागरिकांमध्ये लोकप्रिय आहे.


सम्बन्धित सामग्री