Thursday, September 19, 2024 10:49:54 PM

'पहिली ते दहावी मराठी भाषा अनिवार्य' - राज ठाकरे

पहिली ते दहावी मराठी भाषा अनिवार्य - राज ठाकरे

२८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: विश्व मराठी संमेलनाला राज ठाकरे यांची विशेष हजेरी लाभली. मराठी भाषा सर्वात उत्तम आहे. समृद्ध भाषा आहे. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथे राहताय ती भाषा प्रथम शिका. त्यात कसला कमीपणा आला. मराठीबद्दल बोलले की तुम्ही म्हणणार हे संकुचित आहेत. या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या भाषेबद्दल, त्यांच्या राज्याबद्दल वाटते, जगातील सर्वांत मोठा पुतळा त्यांना गुजरातमध्ये बांधावासा वाटतो, गिफ्ट सिटी पंतप्रधानांना गुजरातमध्ये बांधावी वाटत असेल, हिऱ्यांचा व्यापार त्यांना गुजरातमध्ये न्यावासा वाटतो, जर पंतप्रधानांना स्वत:च्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल, तर तुम्ही-आम्ही का लपवतो, अशी विचारणा करत, काही जण म्हणतील पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत आहे. परंतु ही टीका नाही. त्यांच्यासारखे प्रेम आपण आपल्या राज्याबद्दल दाखवले पाहिजे. आपण आधी महाराष्ट्राकडे लक्ष दिले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी नमूद केले.

भाषेला विरोध नाही. पण हिंदी काही राष्ट्रभाषा नाही. जशा इतर भाषा आहेत, तशीच हिंदी एक भाषा आहे. देशात राष्ट्रभाषेचा कधी निवाडा झालाच नाही. आमच्यावर हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले. बोलण्यात आपण मराठी लोक हिंदी का वापरतो? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. मराठी भाषेत जो विनोद होतो, तो दुसऱ्या कुठल्या भाषेत होत असेल असे मला वाटत नाही. पण आज ही भाषा बाजूला सारण्याचा राजकीय प्रयत्न होतो आहे. ते पाहून माझी तळपायाची आग मस्तकात जाते, या शब्दांत राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.


सम्बन्धित सामग्री