Saturday, September 28, 2024 03:52:40 PM

132253
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा

नाशिक, १२ जानेवारी, २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचे सकाळी नाशिक येथे आगमन झाले. नाशिकमध्ये त्यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. तसेच रामकुंडाला भेट दिली. काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. पंतप्रधान मंदिरात थोडा वेळ भजनात दंग झाले, नंतर त्यांनी रामाची पूजा केली. मंदिर प्रशासनाच्यावतीने पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी पंतप्रधान मुंबईच्या दिशेने रवाना होतील. ते शिवडी - न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार आहेत तसेच सेतूवरून प्रवास करून नवी मुंबई येथे जातील आणि एक सभा घेतील.

https://www.youtube.com/watch?v=0L4W0vDzcW4

https://www.youtube.com/watch?v=8dj_fAV8O64

अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू

नागरिकांसाठी शहरी पायाभूत सुविधा आणि वाहतुक सुविधा अधिक बळकट करून 'सुलभ गतिशीलतेला' चालना देणे, पंतप्रधानांचे ध्येय आहे. या अनुषंगाने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) बांधण्यात आला असून त्याचे नाव आता 'अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू करण्यात आले आहे. या पुलाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्याच हस्ते डिसेंबर २०१६ मध्ये झाली होती.

अटल सेतू, एकूण १७ हजार ८४० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधण्यात आला आहे. सुमारे २१.८ किमी लांबीचा सहा पदरी हा पूल असून समुद्रावर तो सुमारे १६.५ किमी लांबीचा तर जमिनीवर सुमारे ५.५ किमी लांबीचा आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, तसेच देशातील सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार असून मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठी प्रवासाच्या वेळेतदेखील बचत होणार आहे. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर दरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होणार आहे.

नवी मुंबई येथे सार्वजनिक कार्यक्रम

नवी मुंबई येथे होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान १२ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पूर्व मुक्त मार्गाचे ( ईस्टर्न फ्री वे ) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची पंतप्रधान यावेळी पायाभरणी करणार आहेत. हा ९.२ किमी लांबीचा बोगदा ८७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून बांधला जाईल. हा बोगदा मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरेल. यामुळे ऑरेंज गेट आणि मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल.

सूर्या या मोठ्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. १९७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून सुमारे चौदा लाख लोकसंख्येला यामुळे पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे. याच कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

यामध्ये ‘उरण-खारकोपर रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा’ समावेश आहे. ज्यामुळे नवी मुंबईशी स्थानिक संपर्क अधिक वाढेल; कारण नेरुळ/बेलापूर ते खारकोपर दरम्यान असलेल्या उपनगरीय रेल्वेसेवा आता उरणपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवून त्याचेही उदघाटन पंतप्रधान करतील.

याशिवाय इतर रेल्वे प्रकल्प जे राष्ट्राला समर्पित केले जाणार आहेत, त्यामध्ये ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक 'दिघा गाव' तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईतील हजारो प्रवाशांचा दैनंदिन रेल्वेप्रवास सुलभ होणार आहे.

पंतप्रधान विशेष आर्थिक क्षेत्र - मेटल सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक निर्यात प्रक्रिया विभाग - (SEEPZ SEZ) येथे असलेल्या, 3D प्रिंटिंग मशिनसह जगातील सर्वोत्तम उपलब्ध मशिन्ससह भारतात सुरू झालेल्या पहिल्या रत्ने आणि आभूषणे क्षेत्राच्या 'भारतरत्न' या विशाल सर्वसाधारण सुविधा केंद्राचे (मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर) उद्घाटन करतील. यामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसह या क्षेत्रातील कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी विशेष केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे विशाल केंद्र (CFC) रत्न आणि दागिन्यांच्या व्यापारात निर्यात क्षेत्राचा कायापालट करेल आणि देशांतर्गत उत्पादनालाही मदत करेल.

सिप्झ विशेष आर्थिक क्षेत्र(SEEPZ- SEZ) येथील नवीन उपक्रम आणि सेवा केंद्र (NEST) - याचेही उदघाटन पंतप्रधान करणार आहेत. NEST - 01 हे प्रामुख्याने रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी सुरू केलेले केंद्र आहे जे सध्या स्टँडर्ड डिझाइन फॅक्टरी-I येथे आहे. उद्योगाच्या मागणीनुसार तसेच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी हे नवीन केंद्र तयार बांधण्यात आले आहे.

कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करतील. या अभियानाचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकता विकासासाठी सक्षम करणे हा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि परिपूर्णता यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव

देशाच्या विकासाच्या प्रवासात युवावर्गाला प्राधान्य देण्यासाठी पंतप्रधान सतत प्रयत्नशील असतात. या प्रयत्नातील आणखी एक पाऊल म्हणून, पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमध्ये २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे (NYF) उद्घाटन केले.

दरवर्षी १२ ते १६ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित केला जातो. १२ जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन आहे. यंदाच्या महोत्सवाचे यजमानपद महाराष्ट्र भूषवित आहे. विकसित भारत : @ २०४७ ,तरुणांसाठी, तरुणांद्वारा (Viksit Bharat@2047) ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे

भारतातील विविध प्रदेशातील तरुण त्यांचे अनुभव सामायिक करू शकतील आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेने एकसंघ राष्ट्राचा पाया मजबूत करू शकतील, या भूमिकेतून राष्ट्रीय युवा महोत्सव हा मंच तयार करण्यात आला आहे. नाशिक येथील महोत्सवात देशभरातून सुमारे साडेसात हजार युवा प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम, देशी खेळ, आणि विविध विषयांवर आधारित सादरीकरण, युवा कलाकार शिबिर, पोस्टर मेकिंग, कथा लेखन, युवा संमेलन, खाद्य महोत्सव इत्यादींसह विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात येणार आहे.


सम्बन्धित सामग्री