Sunday, April 06, 2025 12:25:54 PM

एमबीएचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला

एमबीएचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला

पुणे, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पेपरफुटीचं प्रकरण समोर येताच पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे.

फुटलेला पेपर पुन्हा घेण्यात येईल, असं विद्यापीठाने जाहीर केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे. परीक्षा विभागातर्फे पुणे , अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमध्ये संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे. २२ डिसेंबर रोजी विद्यापीठातील एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील लीगल अस्पेक्ट ऑफ बिझनेस या विषयाची परीक्षा होती.

मात्र, चिखली येथील डी वाय पाटील येथून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर विद्यापीठाने ही परीक्षा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फुटलेल्या विषयाचा पेपर येत्या २६ डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२.३० पुन्हा घेतला जाणार असल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरीकडे, पेपरफुटीप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. तसेच दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री