Friday, July 05, 2024 11:19:13 PM

विठुराया महिनाभराच्या विश्रांतीसाठी निसर्गरम्य विष्णूपदावर

विठुराया महिनाभराच्या विश्रांतीसाठी निसर्गरम्य विष्णूपदावर

पंढरपूर, १७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मराठी महिन्यानुसार सध्याच्या मार्गशीर्ष महिन्यात विठुराया हे विश्रांतीसाठी गोपाळपूरी जाऊन पोहोचले आहे. मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे वास्तव्य हे मंदिरात नसून गोपाळपूर जवळच्या विष्णूपदावर असते. मंदिराप्रमाणेच विष्णूपदावर देखील विठ्ठलाचे पहाटेपासून रात्रीपर्यंत सर्व राजोपचार होतात. त्यामुळे सध्या मंदिरासोबतच चंद्रभागेकाठी असणाऱ्या विष्णूपदावर विठुभक्तांची मांदियाळी भरली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी साक्षात पांडुरंग उपस्थित होते. माऊलींसारखा आपला लाडका फक्त समाधीस्थ झाला. त्यामुळे विरहाने आळंदीहून पंढरपुरात परतलेले पांडुरंग थेट गोपाळपूरच्या चंद्रभागेच्या तीरावर वास्तव्यास गेले. पांडुरंगाने तिथे गाई गोपाळासह एक महिना वास्तव्य केले. म्हणून मार्गशीर्ष महिन्यात विठ्ठलाचे विष्णूपदावर वास्तव्य असते. अशी आख्यायिका रूढ आहे. तर, रुक्मिणी मातेच्या शोधार्थ आलेल्या कृष्णाने गायी गोपकासह चंद्रभागेच्या काठावर वेणूनाद केला. ते स्थान म्हणून देखील विष्णूपद प्रचलित आहे.याशिवाय देशात गया येथे विष्णूच्या पादुका आहेत. त्यानंतर अशा पादुका केवळ पंढरपुरात असलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे या स्थानाला पौराणिक ग्रंथानुसार विशेष महत्व आहे.


सम्बन्धित सामग्री