Friday, July 05, 2024 06:17:19 AM

अवकाळीमुळे बळीराजावर आस्मानी संकट

अवकाळीमुळे बळीराजावर आस्मानी संकट

गोंदिया, ०१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : गोंदिया जिल्ह्यात अवकाळीच्या स्वरूपात बळीराजावर आस्मानी संकट आले आहे. गोंदियात मोठ्या प्रमाणात भात शेतीचे क्षेत्र आहे. या भातशेतीला अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. गोंदियातील आठ तालुक्यातील साधारण २,७७५ हेक्टर क्षेत्र अवकाळीमुळे प्रभावित झाले आहे. अनेक ठिकाणी भात पिकाची मळणी सुरू होती आणि अचानक झालेल्या पावसामुळे भात पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या सोबतच भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

गोंदियात २८ नोव्हेंबर रोजी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जवळपास ५९३३ शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. भातासोबतच भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. अवकाळीनंतर लगेचच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तातडीने नुकसान भरपाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार नुकसानीच्या संदर्भातला अहवाल विभागीय स्तरावर पाठवण्यात आला आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर भरपाई मिळावी आणि पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर टोल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन गोंदिया जिल्ह्याचे अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे, आता शासनाची मदत कधी पोहोचणार याकडे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.


सम्बन्धित सामग्री