Wednesday, October 02, 2024 11:11:58 AM

ऊस आंदोलनाचा शेवट गोड

ऊस आंदोलनाचा शेवट गोड

कोल्हापूर, २४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: नऊ तास राष्ट्रीय महामार्ग रोखून झाल्यानंतर अखेर कारखानदारांनी नमते घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी मान्य केली आहे. दीड महिन्यांपासून करण्यात आलेल्या ऊस दर आंदोलनाला अखेर यश मिळालं असून अतिरिक्त शंभर रुपयांची मागणी कारखानदारांनी मान्य केली.

येत्या दोन महिन्यात शेतकऱ्यांचे हे पैसे दिले जाणार आहेत याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर साखर कारखान्याचे धुराडे पेटणार आहे. स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर गुलालाची उधळण करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी अचानक आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.

गुरुवारी झालेल्या चर्चेत मागील हंगामात ३ हजार पेक्षा अधिक दर दिलेल्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना पन्नास रुपये अतिरिक्त द्यावेत तर ३ हजार पेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी शंभर रुपये अतिरिक्त द्यावेत असा प्रस्ताव मान्य करून याबाबतचे लेखी आश्वासन घेऊन शिष्टमंडळ आंदोलन स्थळी आले आणि यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. स्वाभिमानीने केलेल्या चक्काजाम आंदोलनाला यश आल्यानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.


सम्बन्धित सामग्री