Sunday, July 07, 2024 08:19:23 PM

कोस्टल रोडच्या कामाला गती

कोस्टल रोडच्या कामाला गती

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : सागरी किनारी मार्गाच्या कोस्टल रोड पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी सी फेसवरील एका मार्गिकेची वाहतूक ४ नोव्हेंबर २०२३ ते ३१ मे २०२४ या सात महिन्यांच्या कालावधीत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे. वाहतूक विभागाने या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. सी फेसच्या खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदूमाधव ठाकरे जंक्शन ते जे. के. कपूर जंक्शन, प्रभादेवीच्या दिशेने जाणारी ही मार्गिका आहे.

किनारी मार्गाचे कोस्टल रोड काम वेगात सुरू असून, आतापर्यंत ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण १०.५८ किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात २ किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले असून, पहिल्या बोगद्याचे काम १० जानेवारी २०२२ रोजी, तर दुसऱ्या बोगद्याचे काम ३० मे रोजी पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोडची एक मार्गिका नोव्हेंबरपर्यंत सुरू करून प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू होता. तसे पालिका प्रशासनाकडून जाहीरही करण्यात आले होते. मात्र, शिल्लक कामावर परिणाम होणार असल्याने ही मार्गिका सुरू करण्याची प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता मे २०२४ पर्यंत ही मार्गिका सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रकल्पाच्या उर्वरित कामाला वेग देण्यासाठी खान अब्दुल गफार खान मार्गावरील बिंदूमाधव ठाकरे जंक्शन ते जे. के. कपूर जंक्शनकडे जाणारी मार्गिका बंद ठेवून केवळ वरळी सी-लिंकवर जाणारी वाहतूक सुरू राहणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्ग म्हणून खान अब्दुल गफार खान उड्डाणपूल ते वरळी नाका-पोदार जंक्शन या मार्गाचा वापर करता येणार आहे. त्यासोबतच बिंदूमाधव ठाकरे जंक्शनहून उजवीकडे वळल्यावर सर पोचखानवाला मार्ग येथून जे. के. कपूर जंक्शन येथे पोहोचता येईल, अशी माहिती वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री