Tuesday, July 02, 2024 09:25:56 AM

मृत्यूचं तांडव सुरुच

मृत्यूचं तांडव सुरुच

नांदेड, ३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: शहरातील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली अन् राज्यभरात खळबळ उडाली. मात्र, या रुग्णालयात मृत्यूचं तांडव सुरुच असून, पुन्हा ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ४ बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य विभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

https://twitter.com/AshokChavanINC/status/1709052924507344973

सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

भाजपा सरकारला सामान्य जनतेचे आणखी किती बळी हवे आहेत? आरोग्याशी संबंधित यंत्रणेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरु असताना राज्यकर्ते हात बांधून स्वस्थ बसले आहेत. संवेदनशील राज्यकर्त्यांनी आतापर्यंत संबंधित मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता‌. नांदेड, ठाणे येथील रुग्णांच्या मृत्युंचे प्रकरण ताजे असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात एकाच दिवशी दहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर नांदेडच्या त्याच रुग्णालयात आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला असून ही संख्या आता २४ वरुन ३१ झाली आहे. हे सर्वजण सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष व निष्काळजीपणाचे बळी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्थेमध्ये अनागोंदी कारभार दिसत असूनही यावर उपाययोजना करण्याची शासनाची मानसिकता दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधित मंत्र्यांचा राजीनामा देऊन आरोग्यव्यवस्थेचा आढावा घेणे आवश्यक आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली, या रुग्णांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

राज ठाकरेंची प्रतिक्रिया

नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे 'औषध पुरवून वापरा' असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.

https://twitter.com/RajThackeray/status/1709046795030986798


सम्बन्धित सामग्री