Thursday, July 04, 2024 08:55:56 AM

कांदा फोडी सुटली ?

कांदा फोडी सुटली

नाशिक, २ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: विंचूर बाजार समिती पाठोपाठ आता लासलगाव बाजार समितीची उपबाजार समिती असलेल्या निफाड उपबाजार आवारामध्ये कांद्याचे लिलावास आज पासून पुन्हा सुरू झाले आहेत. गेल्या बारा दिवसांपासून व्यापाऱ्यांच्या बंदमुळे हैराण झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. कांद्याला जास्तीत जास्त २४०० सरासरी २१००, कमीत कमी ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे. निफाड बाजार समिती ४५० वाहनाची आवक झाली. येत्या गुरुवारी देखील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील मुख्य आवारात कांदा लिलाव सुरू होणार असल्याची माहिती आहे.

आज नाशिक जिल्ह्यातील विंचूर, निफाड आणि नाशिक मध्ये कांदा लिलाव सुरू झाले आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. याच निर्णयामुळे गेल्या १३ दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे लिलाव ठप्प झाले होते. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते मात्र, काही व्यापाऱ्यांनी वेगळी भूमिका घेत लिलाव सुरू करण्याचे निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांमध्ये फूट पडल्याचे बोलले जात आहे. सोमवारी (दि. २ ऑक्टोबर २०२३) लिलाव सुरू झाल्यानंतर १८०० ते २२०० रुपये दर क्विंटलमागे कांद्याला मिळाले. तर दुसरीकडे कांदा लिलाव बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, आज पुन्हा एकदा कांदा व्यापारी संघटनेच्या वतीने बैठक बोलवण्यात आली आहे. आजच्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री